Home Cities बुलढाणा अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री फुंडकरांचा निर्णय; वाढदिवस साजरा न करण्याची घोषणा

अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री फुंडकरांचा निर्णय; वाढदिवस साजरा न करण्याची घोषणा


खामगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली असताना राज्याचे कामगार मंत्री ना. अँड. आकाश फुंडकर यांनी आपला येणारा वाढदिवस कोणत्याही प्रकारे साजरा न करण्याचा संवेदनशील निर्णय जाहीर केला आहे.

येत्या ५ फेब्रुवारी रोजी असलेला स्वतःचा वाढदिवस कोणत्याही शुभेच्छा, कार्यक्रम किंवा उत्सवाशिवाय साधेपणाने पार पाडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

अजितदादा पवार यांचे नुकतेच विमान अपघातात निधन झाले असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेत सहकारी म्हणून काम करताना अजितदादांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यांच्या नेतृत्वशैलीतून राजकारणासोबत समाजकारणाचे धडे घेतल्याचे फुंडकर यांनी नमूद केले. लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर आणि अजितदादा पवार यांचेही जिव्हाळ्याचे संबंध होते, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

वित्तमंत्री म्हणून कार्यरत असताना अजितदादा पवार यांनी खामगाव मतदारसंघाच्या विकासासाठी कधीही निधीची कमतरता पडू दिली नाही, असे सांगत फुंडकर यांनी त्यांच्या कार्याची कृतज्ञतेने आठवण केली. अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

५ फेब्रुवारी रोजी आपण खामगाव शहरात उपलब्ध राहणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊ नयेत, तसेच शहरात किंवा इतरत्र वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही वृत्तपत्रात किंवा सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ नयेत, अशीही स्पष्ट सूचना त्यांनी समर्थकांना दिली आहे.

अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रती आदर व्यक्त करत साधेपणाने शोक व्यक्त करण्याचा हा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले असून, त्यांच्या या भूमिकेचे राजकीय वर्तुळातून स्वागत होत आहे.


Protected Content

Play sound