जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील विठ्ठलवाडी परिसरामध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेची सोनसाखळी अज्ञात २ भामट्यांनी लांबवून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, शालिनी वामनराव भावे (वय ७५, रा. विठ्ठलवाडी, निमखेडी शिवार, जळगाव) या वृद्ध महिला त्यांच्या घराजवळ उभ्या होत्या. त्यावेळेला दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना पत्ता विचारला. मात्र त्यांची बोलण्याची भाषा न समजल्याने शालिनी भावे या पुढे चालू लागल्या. तेवढ्यात दोघे भामट्यांनी संधी साधून शालिनी भावे यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची १ लाख २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओढून पल्सर दुचाकीवरून फरार झाले. याप्रकरणी रात्री दहा वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.