भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील १७५ सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांनी आदिशक्तीला वाजतगाजत निरोप दिला. १७५ पैकी ४५ मंडळांचा सार्वजनिक मिरवणुकीतील सहभाग नियोजित होता. पैकी सहा मंडळांनी मिरवणुकीत सहभागी न होता परस्पर वाघूर धरणावर विसर्जन केले. त्यामुळे ३९ मंडळांच्या सहभागाने मिरवणूक ८ तास उलटून सुद्धा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू होती.
शहरात ९ दिवस नवरात्रोत्सवाची धूम होती. विजयादशमीच्या दिवशी उत्साह शिगेला पोहोचला होता. यानंतर मंडळांनी जड अंतःकरणाने आदिशक्तीला निरोप दिला. दरम्यान, शहरात बाजारपेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण १७५ दुर्गोत्सव मंडळे असले तरी फक्त ४५ मंडळांनी सार्वजनिक मिरवणुकीत सहभागाची तयारी दाखवली. दुर्गा विसर्जन मिरवणुकीत मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाजंत्रीला परवानगी होती. यानंतर जी मंडळे विसर्जन मिरवणुकीत राहिली होती. त्या सर्वांची वाजंत्री पोलिसांनी बंद केली. डीवायएसपी कृष्णांत पिंगळे व दोन्ही पोलिस ठाण्याचे अधिकारी लक्ष ठेवून होते. वाजंत्री बंद केल्यानंतर मंडळांना विनावांजत्री विसर्जनस्थळ गाठावे लागले. मिरवणुकीत सहभागी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत विविध प्रकारचे सादरीकरण केले.