जेवणावरून झालेल्या वादात एका मित्राने केला दुसऱ्या मित्रावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | डेकोरेशनचे काम करणाऱ्या दोन मित्रांमध्ये जेवणाच्या क्षुल्लक कारणावरून खटके उडून वादाचे रुपांतर रक्तरंजित राड्यात झाले. आरोपीने सहकाऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कोनगाव बकरी मंडई भागात असलेल्या एका मंडपच्या गोदामात घडली. हल्लेखोर सहकाऱ्यावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सलीन अन्वर खान(वय ३७) हे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. तर भरत शामबाबू राजलोहार असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहकाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गोविंदकुमार मुन्ना वर्मा याचा भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील बकरी मंडई भागात डेकोरेशनचा व्यवसाय आहे. यात जखमी भरत आणि आरोपी सलीम हे दोघेही त्यांच्यासोबत काम करतात. दोघे १९ मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कोनगाव परिसरातील म्हात्रेगाव मैदानातील इंग्रजी माध्यमिक विद्यालयाजवळील अनिल कुमार यांच्या गोदामात मंडप डेकोरेशनचे काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी भरत आणि सलीन यांच्यामध्ये जेवणावरून वाद होऊन वादाचे रुपांतर राड्यात झाले. यावेळी सलीमने रागाच्या भरात भरतवर कुऱ्हाडीने वार केले. यात भरत गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती कोनगाव पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गोविंदकुमार वर्मा याच्या फिर्यादीवरून सलीमवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून २० मे रोजी अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Protected Content