नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील ३० वर्षांपासून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली जात आहे. ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिला नसल्याने बॅलेटपेपरद्वारेच मतदान झाले पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे सांगतानाच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३७० लोकसभा मतदारसंघात घोळ असल्याचा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. एवढेच नव्हे तर, तर आता ईव्हीएमवर काय करायचे? हे महाराष्ट्रात पोहोचल्यावर ठरवू, असे सूचक विधानही प्रसारमाध्यमांशी बोलताना राज यांनी केले आहे.
ईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला आहे, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदाराना त्यांनी कुणाला मतदान केले ते समजले पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत होते की, त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही असेही राज ठाकरेंनी म्हटले. तसेच मी बॅलेट पेपरची मागणी केली आहे. मी औपचारिकता म्हणूनच भेट घेतली आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. मॅच फिक्स असेल तर तयारी करण्याला काय अर्थ आहे? असेही राज ठाकरेंनी विचारले आहे. तसेच ईव्हीएमची चीप अमेरिकेहून येत असेल तर हॅकिंगची शक्यता आहेच असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. तर आता ईव्हीएमवर काय करायचे हे महाराष्ट्रात पोहोचल्यावर ठरवू असे सूचक विधान मनसे अध्यक्षांनी केले आहेत. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणूक लढवली नाही तरीही राज ठाकरेंनी काँग्रेससाठी प्रचारात सहभाग नोंदवला होता. या निवडणुकीत पराभूत झालेल्यांना तर सोडाच विजयी होणाऱ्यांना सुद्धा ईव्हीएमवर शंका असल्याचे यावेळी राज ठाकरेंनी सांगितले. येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. या निवडणुकीत मनसेची काय रणनिती असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.