नवीदिल्ली, वृत्तसंस्था | गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान याचा भारत विरोध वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकतेच त्याने भारताबद्दल एक चुकीचे आणि खोटे ट्विट केले होते. नेटकऱ्यांनी त्याला यावरून चांगलेच ट्रोल केल्यानंतर त्याने ते ट्विट डिलीट केल्याचेही दिसून आले. मात्र तोपर्यंत त्या ट्विटचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते.
उत्तर प्रदेशमध्ये पोलीस कथितरित्या हिंसाचार करत असल्याचे या ट्विटमध्ये म्हटले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनीही यावर ट्विट करत ते व्हिडीओ भारतातील नसल्याचे म्हटले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधादरम्यान भारतात पोलिसांचा हिंसाचार असे म्हणत इम्रान याने तीन व्हिडीओ पोस्ट केले होते. भारतातील पोलीस मुस्लिमांवर हल्ला करत असल्याचेही त्याने यात म्हटले होते. परंतु त्याने पोस्ट केलेले व्हिडीओ खोटे असल्याचे तेव्हा समोर आले, जेव्हा ते भारतातील नसून बांगलादेशील असल्याची माहिती उघड झाली. ते व्हिडीओ २०१३ मधील असून बांगलादेशातील रॅपिड अॅक्शन बटालियन काही तरूणांना मारत असतानाचे होते.
उत्तर प्रदेश पोलिसांप्रमाणेच परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनीही यावर कठोर शब्दात निशाणा साधला. खोट्या बातम्या ट्विट करा, पकडले जा, ट्विट डिलिट करा आणि पुन्हा तेच काम करा, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनीही पाकिस्तानकडून असे प्रकार वारंवार होत असल्याचे म्हटले आहे.