Home प्रशासन तहसील ‘समाधान शिबिर’ अभियान प्रभावीपणे राबवा- तहसीलदार संजय तायडे

‘समाधान शिबिर’ अभियान प्रभावीपणे राबवा- तहसीलदार संजय तायडे


 रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित प्रशासकीय अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी ‘समाधान शिबिर’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश तहसीलदार संजय तायडे यांनी दिले आहेत. आगामी शिबिरांच्या पार्श्वभूमीवर रावेर तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, विविध शासकीय विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

रावेर तालुका येथील तहसील कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. तहसीलदार संजय तायडे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत शिबिरांमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची समस्या तत्काळ निकाली काढण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट केले. गरीब, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या समाधान शिबिरांमध्ये शेतीविषयक अडचणी, संजय गांधी योजना, रेशनकार्ड संदर्भातील प्रश्न, विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले, पीएम किसान, ॲग्री टेक यांसह शासनाच्या विविध योजनांबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण केले जाणार आहे. नागरिकांना एका ठिकाणी सर्व विभागांचे प्रतिनिधी उपलब्ध करून देत तातडीने निर्णय घेण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

शिबिरांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. दि. 7 मार्च रोजी पाल, दि. 8 मार्च रोजी खिरोदा (प्र. यावल), दि. 14 मार्च रोजी वाघोड, दि. 10 एप्रिल रोजी केर्‍हाळा, दि. 11 एप्रिल रोजी निंभोरा, दि. 17 एप्रिल रोजी ऐनपूर, दि. 18 एप्रिल रोजी खिर्डी, दि. 8 मे रोजी सावदा आणि दि. 15 मे रोजी रावेर येथे शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

या बैठकीस नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांच्यासह कृषी विभाग, भूमी अभिलेख, महावितरण, ग्रामीण पाणीपुरवठा, राज्य परिवहन, पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास प्रकल्प तसेच इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून शिबिरे यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Protected Content

Play sound