जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यामध्ये अतिसार (डायरिया) या आजाराचे प्रमाण वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेतर्फे “स्टॉप डायरिया अभियान” राबविले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पाणी व स्वच्छता क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून अभियान प्रभावीपणे राबविणेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत यांनी संबंधीतांना सूचना केल्या आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘स्टॉप डायरिया’ अभियानामध्ये जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये दूषित आढळलेले पाणी नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर या अभियानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येऊन ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणा सर्व विभाग या अभियानात सहभाग घेऊन नियोजन करणेबाबत सुचित केले आहे. गावपातळीवर पाण्याचे व्यवस्थापन व स्वच्छता, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता उपक्रम राबविणे, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता व एफटीके किटद्वारे पाणी तपासणी करणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे हागणदारीमुक्त अधिक करणे, छतावरील पाऊस पाणी संकलन राबविणे, पाणी स्वच्छतेचे महत्व आणि त्याचा गावपातळीवरील होणारा परिणाम याविषयी जनजागृती मोहीम गावस्तरावर राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रभावी अमलबजावणीसाठी उद्या ९ रोजी श्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट व समूह समन्वयक, तालुका वैद्यकीय अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. असे प्रकल्प संचालक भरत कोसोदे यांनी सांगितले आहे.