नांद्रा, ता.पाचोरा, प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या रेल्वेच्या नांद्रा-माहेजी गेटजवळ आज दुपारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर जाणाऱ्या डाऊन काशी एक्सप्रेसच्या इंजिनात अचानक बिघाड झाल्याने ही गाडी तत्काळ थांबवण्यात आली. त्यामुळे रेल्वे वाहतुकीचा काही वेळ खोळंबा झाला तर चाळीसगाव आणि पाचोरा येथून जळगावला अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाने लवकरच उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली आहे.
अधिक माहिती अशी की, ही रेल्वे गाडी आज नांद्रा-माहेजी गेटजवळून जात असताना इंजिनावर असलेल्या तारेला इंजिनाशी जोडणाऱ्या कनेक्टरमधून अचानकपणे आगीचे गोळे व धूर निघू लागल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्याने गाडी माहेजी स्टेशननजीक थांबवली. ही गाडी मुख्य मार्गावर अडकल्याने मागची वाहतूक खोळंबली. त्यातच चाळीसगाव आणि पाचोरा येथून जळगावला अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाल्याने त्यांनी बस वाहतुकीने जळगावला जाण्यासाठी नांद्रा स्थानकावर गर्दी केली होती. दरम्यान रेल्वे चालकाने भुसावळ येथे व्यवस्थापनाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिल्याने त्याच मार्गावरून पाठीमागून येणारी मालगाडी थांबवून तिचे इंजीन एक्सप्रेसला जोडले व तिला पुढे रवाना करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.