Home धर्म-समाज पाचोऱ्यात कृष्णा सागर धरणात गणरायाच्या विसर्जनास सुरुवात 

पाचोऱ्यात कृष्णा सागर धरणात गणरायाच्या विसर्जनास सुरुवात 

0
162

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या दहा दिवसांपासून घराघरात आणि मंडपांमध्ये भक्तिभावाने विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला आज पाचोऱ्यातील कृष्णा सागर धरणात भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून, विसर्जन सोहळ्यास सुरुवात झाली आहे. पाचोरा-जळगाव मार्गालगत असलेल्या कृष्णा सागर धरणावर महत्त्वपूर्ण सुरक्षाव्यवस्था आणि सुविधांसह विसर्जनासाठीचा संपूर्ण घाट सुसज्ज करण्यात आला आहे.

विसर्जन स्थळी महापालिकेने १ क्रेन, प्लॅटफॉर्म, फायर फायटर वाहन, निर्माल्य संकलन केंद्र, तसेच रात्रीसाठी फ्लडलाईटची व्यवस्था केली आहे. विसर्जनाच्या वेळी कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून पट्टीचे पोहणारे कर्मचारी धरणात तैनात करण्यात आले आहेत. धरणाच्या परिसरात भाविकांची मोठी गर्दी असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने बंदोबस्तात कोणतीही कसूर ठेवलेली नाही.

पोलीस प्रशासनातर्फे ५ अधिकारी, ४५ पोलीस अंमलदार, ५० होमगार्ड, १६ कर्मचाऱ्यांसह १ आरसीपी प्लाटून, ५ रेल्वे पोलिस, तसेच जळगाव येथून एक स्ट्राइकिंग फोर्स पाचारण करण्यात आले आहे. विसर्जन स्थळी येणाऱ्या नागरिकांच्या हालचालींवर सतत नजर ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत. विसर्जन व्यवस्था शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन आखले आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी सांगितले की, गणेश विसर्जनानंतर येत्या रविवारी, ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ईद ए मुबारकच्या जुलूसासाठीही असाचच बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी शांतता राखावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

एकूणच, कृष्णा सागर धरणावर आज सुरू झालेला विसर्जन सोहळा हा भक्तिभाव, सुरक्षितता आणि नियोजनाचा उत्तम मिलाफ ठरत आहे. पाचोऱ्यातील भाविक उत्साहात व शांततेत बाप्पाला निरोप देत असून, प्रशासनाच्या सज्जतेमुळे हा सोहळा सुरळीत पार पडतो आहे.


Protected Content

Play sound