यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मार्च २०२० ते २०२१ या कोवीड १९ च्या संचारबंदी काळातील झालेल्या विविध विकास कामे ही निकृष्ट दर्जाची झाली असून त्यांची तात्काळ चौकशी करा अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले यांनी केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, यावल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातुन अनेक गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध विकासकामे करण्यात आली. या विकास कामांबाबत गावपातळीवरून अनेक ग्रामस्थांच्या व विविध सामाजीक व राजकीय पक्षाच्या पदाधिकारींच्या ही कामे निकृष्ट प्रतीची झाल्याबाबत तक्रारी आहेत. मात्र, प्रशासकीय यंत्रणेकडुन या तक्रारींकडे दुर्लक्ष करून संबंधीत ठेकेदारांशी हात मिळावणी करून निकृष्ट कामांची बिले अदा करण्यात आली. याबाबत यावल पंचायत समितीमार्फत झालेल्या या सर्व कामांची सखोल चौकशी करण्यात यावी. तालुक्यातील डोंगर कठोरा व डोंगरदे शिवारातील नदीपात्रातील पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत झालेली नाला बांधाची कामे अत्यंत खराब प्रतीचे साहीत्य वापरून बांधकाम करण्यात आले आहे. या पावसाळ्यात हे कामे वाहुन जाण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे राज्य शासनाकडुन तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये आदीवासी वस्ती पाड्यांवर झालेल्या कोवीड १९ च्या संचारबंदी काळातील परिस्थितीचा फायदा घेत विविध विकास कामांची तात्काळ चौकशी करण्यात यावी अन्यथा कायदेशीर पद्धतीने न्यायालयाचे सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान आज यावलचे पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांना पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदीवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष एम. बी. तडवी, राष्ट्रवादी तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष निवृत्त धांडे तक्रार निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समितीचे काँग्रेस गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान तक्रारकर्ते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रिफ, सामाजीक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांना देखील चौकशीच्या मागणीची निवेदने ईमेलद्वारे पाठविली असुन, राज्याचे अर्थ व उपमुख्यमंत्री ना. अजित पवारांशी त्यांचे दुरध्वनीव्दारे बोलणे झाले असुन, ना. पवार तात्काळ चौकशीचे आदेश देतो असे आश्वासन दिले आहे.