Home Cities जळगाव पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळील धोकादायक वळणावर तत्काळ ‘सर्कल’ उभारा; नगरसेविका भारती सोनवणे

पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळील धोकादायक वळणावर तत्काळ ‘सर्कल’ उभारा; नगरसेविका भारती सोनवणे


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचा उतार जेथे संपतो, त्या सुरेश कलेक्शनजवळील चौकात रहदारीची समस्या अत्यंत गंभीर झाली असून, या ठिकाणी तत्काळ ‘सर्कल’ विकसित करण्याचा ठराव आगामी महासभेत मंजूर करावा, अशी मागणी नगरसेविका भारती सागर सोनवणे यांनी केली आहे. या संदर्भात पत्र त्यांनी उपमहापौर मनोज चौधरी यांना दिले आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पिंप्राळा उड्डाणपुलाचा उतार थेट या चौकात येत असल्याने आणि याच ठिकाणी नागरिकांची वर्दळ, वाहनांचे पार्किंग व फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने हा परिसर अपघाताचा केंद्रबिंदू ठरत आहे. विशेषतः शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागते. या ठिकाणी वारंवार लहान-मोठे अपघात होत असून, मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारती सोनवणे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, विकास आराखडा (DP Plan) आणि ले-आउटमध्ये या ठिकाणी स्पष्टपणे सर्कल दर्शविलेले आहे. असे असतानाही, संबंधित प्लॉट मालकांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता त्या जागेवर कंपाउंड वॉलचे पक्के बांधकाम केले असल्याचे दिसून येते. हे अनधिकृत बांधकाम तातडीने जमीनदोस्त करून त्या ठिकाणी नियोजित सर्कलचे काम पूर्ण करावे. शहराच्या विकासाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे सर्कल अत्यंत महत्त्वाचे असून, महासभेने या विषयाला प्राधान्य देऊन ठराव मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

 


Protected Content

Play sound