पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महाराणी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर करण्यात याव्यात, अशी मागणी पाचोरा तालुक्यातील बांबरुड–कुरंगी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी पाचोरा प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.
महाराणी अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जावर दोन लाख रुपयांपर्यंत (मुद्दल व व्याजासह) कर्जमाफी देण्याची तरतूद शासनाने केली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असला तरी लाभार्थ्यांच्या याद्या अद्याप जाहीर न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर पदमसिंग पाटील यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पात्र लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर करून त्या ग्रामपंचायत कार्यालय, चावडी, विकास सोसायटी कार्यालय तसेच संबंधित बँकांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची पात्रता तपासणे सोपे होईल आणि योजनेबाबत कोणतीही गैरसमजुती राहणार नाहीत. यासोबतच पारदर्शकता राखण्यासाठी या याद्या अधिकृत शासकीय संकेतस्थळावरही प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे निवेदन उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे आणि तहसीलदार विजय बनसोडे यांना देण्यात आले. निवेदन देताना पदमसिंग पाटील यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे, विकास सोसायटीचे चेअरमन विजय पाटील, हेमराज ठाणसिंग पाटील, संतोष शिवाजी पाटील, राजू नारायण चौधरी, रोहित पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने महाराणी अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना सुरू केल्याबद्दल निवेदनकर्त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या युती सरकारचे तसेच पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांचे आभारही व्यक्त केले. प्रशासनाने लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर करून शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



