फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण भारतवर्षात असलेल्या विविध तीर्थक्षेत्री आणि विविध पीठाधीश्वर असलेले अनेक संत महंत वढोदे येथील निष्कलंक धाममध्ये अवतरले आहेत. सर्वच विभागातून आलेल्या या संत महंत आणि भाविकांमुळे हा महाकुंभ खऱ्या अर्थाने समरस झाला असून या महाकुंभाचे निमंत्रक महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी वढोदे फैजपूर नगरीला वैकुंठनगर बनवले आहे. निष्कलंक धाम वास्तूची स्थापना आणि समरसता महाकुंभाचे आयोजन हे आपले सद्गुरु जगन्नाथ महाराज यांच्या सेवेचे हे फळ आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय संत समितीचे प्रमुख निर्देशक तथा निर्मल पंचायती आखाडा हरिद्वाराचे निर्मल पीठाधीश्वर श्री महंत ज्ञानदेवसिंहजी महाराज यांनी केले.
वढोदे फैजपूर येथे चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे आयोजित समरसता महा कुंभाच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानदेवसिंहजी महाराज हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. त्यानंतर सकाळी दहा ते बारा वाजेदरम्यान पार पडलेल्या प्रथम सत्राच्या व्यासपीठावर समरसता महाकुंभात पहिल्या दिवशी सहभागी झालेल्या अनेक संत महंतांची उपस्थिती होती. स्वामी वासुदेवानंद सरस्वती, ज्ञानेश्वरदासजी महाराज, रामेश्वरदासजी महाराज, ब्रह्मेशानंदजी महाराज, संत श्री शांतीलाल महाराज, गोपाल चैतन्यजी महाराज, राजेंद्रदासजी महाराज, राधे राधे बाबा महाराज, जितेंद्रनाथजी महाराज, आचार्य धर्मदेवजी महाराज, अनंतदेवजी महाराज, देवेंद्रानंदजी महाराज, गौरीशंकर दासजी महाराज, ईश्वरदासजी महाराज, बालकानंदगिरीजी महाराज, अनंतदेवगिरीजी महाराज, रवींद्रपुरीजी महाराज, यांच्यासह शेकडो संत महंत व्यासपीठावर विराजमान होते. प्रारंभी सूत्रसंचालन करताना राधे राधे बाबा यांनी पहिल्या दिवसाचा आढावा घेऊन दुसऱ्या दिवसाच्या संतवचन कार्यक्रमास सुरूवात केली. सुमारे दहा संतमहंतांनी आपले मनोगत व्यक्त करून अध्यक्षीय मनोगत ज्ञानदेवसिंहजी यांनी मांडले. सूत्रसंचालन राधे राधे बाबा इंदौर यांनी तर आभार समरसता महाकुंभाचे निमंत्रक महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी मानले.
जितेंद्रानंदगिरी महाराज –
ज्याप्रमाणे मेडिकल कॉलेज डॉक्टरांची निर्मिती करते अगदी त्याचप्रमाणे संत सभा देशाला चांगली माणसे देण्याचे काम करते. सतपंथाचे स्थान हे पहिल्या पंक्तीतले स्थान आहे. धर्माची रक्षा ही संतच करत असतात. त्यामुळे आपल्याला जर देश बदलून त्याला संघटित करायचे असेल तर संतांच्या मार्गाने चालण्याची गरज आहे.
पंकजदासजी महाराज –
आपल्याला जर चांगला माणूस बनायचे असेल तर आपण चांगल्या मार्गाने मार्गक्रमण केले पाहिजे. धर्माधर्मातील भेद मिटवून एकत्र यायला हवे. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी समरसता महाकुंभ आयोजित करून आपल्यातील भेद मिटवण्याचे काम केले आहे आणि आपल्याला एक चांगला माणूस बनवून चांगल्या मार्गावर चालण्यासाठी सुचित केले आहे.
राजेंद्रदासजी महाराज –
लोकांचे कल्याण व्हावे या हेतूने महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी निष्कलंक धामची स्थापना करून विविध कारणांसाठी हा समरसता महाकुंभ आयोजित केला आहे. गुरूंच्या नावाने कार्य करणे ही खूप मोठी गोष्ट आहे गुरूदेव जगन्नाथजी महाराज यांच्या नावाने आरोग्य धामाची उभारणे आणि विविध कार्य होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे.
ब्रह्माकुमारीज रामनाथ भाई –
समरसता महाकुंभाला असलेली आपली उपस्थिती म्हणजे आपण सर्वांनी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांना दिलेला हात आणि साथ आहे. स्नेह आणि संयोग यांचे मिलन या महाकुंभात दिसत आहे. भारताजवळ काय आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला सत्यासाठी संघटन व एकमत करण्याची गरज आहे, हे जनार्दन महाराजांनी कार्य केले आहे. जे पाहिले, ऐकले आणि समजून घेतले, तेच प्रकाश व शक्ती या ठिकाणी दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. इस्रायलमधून एक तरूण ब्रह्माकुमारीजमध्ये राजयोग शिकण्यासाठी येतो, ही देखील आपल्या भारताची खूप मोठी उपलब्धी असल्याचे ते म्हणाले.
स्वामी अद्वैत अमृतानंदजी महाराज –
सनातन हिंदू धर्माच्या बळकटीसाठी समरसता महाकुंभाचे एक महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे. सर्व संत महंत यांनी मिळून समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे. ऋषींपासून असलेली ही परंपरा संत महंतांनी पुढे सुरू ठेवली असून जनकल्याणासाठी करत असलेले हे कार्य महनीय आहे.
जितेंद्रनंदजी महाराज –
सनातन हिंदू हे पूर्वीपासून संघटित असून काही लोक त्यांना तुच्छ लेखून हिंदूंना दूर केल्याशिवाय सत्ता येणार नाही असे म्हणत आहेत. परंतु आपल्याला सर्वांना एकत्र येऊन आपल्या एकतेचे बळ दाखवायचे आहे. संत हे संघटित करण्याचे कार्य करतात. लाखो हिंदूंनी एकत्र येऊन कमीत कमी वेळात दर्शन घडवण्याचे अत्यंत शिस्तमय कार्य केले आहे. तीर्थक्षेत्रांचा विकास होण्याची गरज आहे. जातीजातींमध्ये भेदाभेद न करता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे एकाच पित्याची चार पुत्रे आहेत. अशाच प्रकारचा सनातन हिंदू धर्म समारंभ दिल्लीत व्हावा, अशी देखील इच्छा त्यांनी व्यक्त केली.
आचार्य मानेकर शास्त्री महाराज –
सनातन हिंदू धर्माचे वेगवेगळे संप्रदाय असले तरी मधल्या कालावधीत हरी आणि हर असा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे धर्म मागे येऊ लागला होता. परंतु संतांनी हा वाद मिटवला आणि यापुढे महानुभाव, स्वामीनारायण, वारकरी, नाथ संप्रदायांना एकत्र करून परिसराची समरसता निर्माण करण्याचे कार्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले असून संपूर्ण देशात ही समरसता निर्माण व्हावी, त्यासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे. तेव्हाच हा समरसता महाकुंभ यशस्वी होईल, असेही ते म्हणाले.
बाळकृष्णदासजी महाराज –
सर्व संतांची सोबत घेऊन देशाचा विकास करावा. धर्म आणि आई यांचे एकच कार्य आहे. दहा वर्षांपूर्वी खूप मोठा समारंभ संत संमेलन पार पडले होते. त्याचे रेकॉर्ड या समरसता महाकुंभ कार्यक्रमाने मोडले आहे. पुढील कार्यक्रम हा गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला जावा, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
अनंत देवगिरीजी महाराज –
आधार व अधिष्ठानात भेद नको. यांना एकसूत्रात बांधण्यासाठी रसस्वरूप परमात्मा तो सर्वांसाठी समान आहे, अशा प्रकारची समरसता या महाकुंभातून दिसत आहे. समरसता याला समानार्थी शब्द मानवता आणि मानवतेला समानार्थी शब्द हिंदुत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातेचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते म्हणाले की, या मातेने देशाला भक्त, शूर, दाता, राष्ट्रप्रेमी असा समर्पित माणूस दिला आहे. संविधानात बदल करण्याची गरज आहे. संविधानातील काही नियमांमुळे हे राष्ट्र विभागले जात आहे. काही लोक भारत जोडो यात्रा काढत आहेत. परंतु भारत तोडण्याचे कार्य त्यांच्याच वाडवडिलांनी केले आहे. 370 कलम हटवावे याची मागणी पूर्वीपासून होती, ती पंतप्रधानांनी पूर्ण केली आहे. आता कलम 30 देखील हटवावा आणि देशात समान नागरी कायदा आणला जावा, जेणेकरून देश हा विविध तुकड्यांमध्ये विभागला जाणार नाही. त्यासाठी हिंदू जागृत होण्याची गरज आहे. दिल्ली येथे अशाच प्रकारचा समारंभ व्हावा असे जितेंद्रनंदजी महाराज यांनी म्हटले होते, त्याचा संकल्प याच समरसता महाकुंभात करण्यात येत आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
रवींद्रगिरीजी महाराज –
सृष्टीत आधी सनत, सनंदन, सनातन व सनतकुमार या संतांची रचना करण्यात झाली. महाराष्ट्र ही महापुरूषांची भूमी आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तपोभूमी व ज्योतिर्लिंग आहेत. ऋषींनी एकच ब्रह्म असे सांगितले आहे. भगवा रंग हा अग्नी व सूर्याचे प्रतीक आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाचा वध केला. राज्य सुरळीत चालण्यासाठी त्यावर धर्माचा अंकुश असणे गरजेचे आहे आणि संतांच्या नियमांनी चालल्यास राज्य सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्ञान, भक्ती व शक्तीचा संगम हा संतांमध्ये आहे. अशा सर्व संतांना एकत्रित करणे सोपे कार्य नाही. महाराष्ट्राच्या या भूमीवर नवीन रामदेव तयार होऊन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी समरसता महाकुंभ स्थापन केला आहे. भृगुऋषी व जनार्दन महाराज यांची एकच रास असल्याने त्यांची नारायणाशी जवळीक आहे. एक पंथ हा सत्याचा पंथ आहे. देश, काल व पात्र यातून समाजाच्या माध्यमातून साधूची निर्मिती होत असते. संपूर्ण जगात अरबो मनुष्य असले तरी सगळ्यांचे रक्त एकच आहे. कारण सर्वांचा पिता एकच आहे. परंतु जातीव्यवस्थेचे जहर देशात आल्याने आपण हजारो वर्ष मागे गेलो. महाराष्ट्रातील मराठा हा मारूनही मागे हटणार नाही अशा पद्धतीचा असल्याने संपूर्ण देशात याच राज्याला महाराष्ट्र असे म्हटले जाते. सारे संत एक असून समरसता संदेश या महाकुंभातून मिळत आहे. अहिल्यादेवी यांनी ज्या पद्धतीने मंदिराचा जिर्णोद्धार केला अगदी त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्य करत असल्याचेही ते म्हणाले.