जळगाव (प्रतिनिधी) शहरातील व.वा. वाचनालयाजवळ असलेल्या डॉ.जे.जी.पंडित आय.एम.ए. हॉल येथील कै.डॉ. दावलभक्त सभागृहात आज (दि.१६) सकाळी १०.०० वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जळगाव शाखेच्या वतीने कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ एक बैठक घेण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर सेक्रेटरी धर्मेंद्र पाटील प्रेसिडेंट अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी सहसचिव डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. चौधरी सहसचिव डॉ. राधेश्याम चौधरी, महाराष्ट्र पदाधिकारी डॉ. अनिल पाटील, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे पदाधिकारी डॉ. प्रताप जाधव, माजी सचिव डॉ. विलास भोळे आणि डॉ. राजेश पाटील, डॉ. अर्जुन भंगाळे, डॉ. चंद्रशेखर सिकची, डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. सुनील नहाटा यांच्यासह शहरातील व जिल्ह्यातील आयएमएचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात आयएमए या संघटनेतर्फे सोमवारी २४ तासाचा बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये आय.एम.ए. संघटना सहभागीही आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सरू राहणार आहेत. डॉक्टर व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना संरक्षणार्थ कायदे करण्यात यावे, डॉक्टरांवरील हल्ले त्वरित रोखण्यात यावेत , हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, कोलकाता येथील हल्ला झालेल्या डॉक्टरांना न्याय मिळावा, पं. बंगाल सरकारने डॉक्टरांची माफी मागावी, अशा मागण्या आयएमए संघटनेने यावेळी मांडल्या.