Home Cities जळगाव आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयएमए डॉक्टरांची बैठक!

आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयएमए डॉक्टरांची बैठक!


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि सरकारी व खासगी क्षेत्रातील डॉक्टरांमध्ये समन्वय वाढवणे हा होता.

या बैठकीत आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध करून देणे, खासगी व सरकारी डॉक्टरांनी एकत्रितपणे संशोधन करणे आणि रोग सर्वेक्षण यंत्रणा बळकट करणे यावर विशेष भर देण्यात आला. आरोग्य क्षेत्रातील संशोधन वाढवण्यासाठी खासगी व सरकारी डॉक्टरांनी एकत्रितपणे क्लिनिकल ट्रायल आणि आरोग्य संशोधन राबवावे अशी संकल्पनाही मांडण्यात आली.

रोग नियंत्रणासाठी ओपीडी आणि फार्मसीमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या माहितीचा उपयोग करून आजारांचे ट्रेंड ओळखण्याची गरज अधोरेखित झाली. डॉक्टरांनी MRI आणि CT स्कॅन सेवा २४ तास सुरू ठेवण्याची मागणी केली. अल्पवजनी बाळांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्यासाठी NICU मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर RBSK योजनेअंतर्गत नियमित तपासणी व देखरेख व्हावी यावर भर देण्यात आला. बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन आणि MPCB प्रमाणपत्र मिळवण्यातील प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय घेण्याची गरजही व्यक्त झाली. PCPNDT कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृतीचे उपक्रम राबवण्याचे सुचवण्यात आले, तसेच विशेष गरजा असलेल्या बालकांच्या वेळेवर ओळखीसाठी जिल्हा अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर (DEIC) चा अधिक परिणामकारक वापर करण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी, “सरकारी व खासगी यंत्रणा एकत्र आल्यास जनतेला दर्जेदार, जलद आणि व्यापक आरोग्यसेवा देता येऊ शकते,” असे स्पष्ट केले. या बैठकीमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा विकास, सेवा गुणवत्तेत वाढ आणि संशोधनात्मक सहकार्यासाठी नव्या दिशा निश्चित झाल्या आहेत.


Protected Content

Play sound