Home पर्यावरण हरताळा उद्यानात बेकायदेशीर तिकीट वसुलीचा प्रकार

हरताळा उद्यानात बेकायदेशीर तिकीट वसुलीचा प्रकार


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथील एकमेव उद्यान, जे श्रावण बाळ समाधी स्थळ आणि चक्रधर स्वामी मंदिरासमवेत एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र मानले जाते, सध्या बेकायदेशीर तिकीट वसुलीच्या प्रकारामुळे चर्चेत आहे. येथील सुरक्षा रक्षकांकडून कोणतीही अधिकृत पावती न देता थेट रोखीने पैसे घेण्यात येत असून, त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटक दोघांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

आज एकादशी असल्यामुळे हजारो भाविक आणि पर्यटक हरताळा उद्यानात दाखल झाले होते. मात्र, प्रवेशद्वारावर कुठल्याही प्रकारची अधिकृत तिकीट व्यवस्था नसताना सुरक्षा रक्षकांनी थेट पैसे उकळण्यास सुरुवात केली. काही पर्यटकांनी विरोध केला असता, रक्षकाने शिवीगाळ करत अरेरावीची भाषा वापरली आणि वाद निर्माण केला. यामुळे अनेक पर्यटक त्रस्त झाले आणि काहींनी परिसर सोडून जाणेच पसंत केले.

वन विभागाशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की सध्या उद्यानासाठी एकच कर्मचारी आहे, आणि तिकिटांची छपाई प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. म्हणूनच तात्पुरत्या स्वरूपात पैसे घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अधिकृत पावतीशिवाय रोखीने पैसे घेणे हा कायदेशीरदृष्ट्या गंभीर प्रकार असून, याबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

हरताळा परिसरातील ग्रामस्थ आणि मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिक आता या प्रकाराने संतप्त झाले असून, उद्यानात पुन्हा शिस्त बसवावी आणि अधिकृत तिकीट प्रणाली राबवावी, अशी मागणी करत आहेत. तसेच स्थानिक इच्छुक तरुणांना नोकरीच्या संधी न देणं आणि एका कर्मचाऱ्यावर संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी टाकणं ही वन विभागाची व्यवस्थापकीय अपयश असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे.

एकूणच, हरताळा येथील उद्यानात बेकायदेशीर वसुली आणि सुरक्षारक्षकाचा दादागिरीखोर वागणूक यामुळे हे शांत आणि पवित्र पर्यटनस्थळ बदनाम होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर यात लक्ष घालावे, हीच जनतेची अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound