यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किनगाव ते यावल रस्त्यावर अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून डंपर ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात डंपरचालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किनगावकडून यावलकडे येणाऱ्या रस्त्यावर अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार शरद शिंदे, पोलीस नाईक अल्ताफ अली आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांचे असे पथक तयार करून कारवाईच्या सुचना दिल्या.
पथकाने सोमवार, दि.२१ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास यावल शहराजवळील फॉरेस्ट नाका जवळ नाका-बंदी केली. त्यावेळी किनगावकडून यावलकडे जाणारा डंपर येतांना दिसून आला. त्यात चोरटी वाहतूक करतांना दिसून आले. त्यांची चौकशी केली असता वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. पोलीसांनी वाळूने भरलेले डंपर यावल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक गणेश गंगाराम सोनवणे (वय-३२) रा. ममुराबाद ता. जि.जळगाव आणि डंपर मालक संदीप आधार साळुंखे रा. कोळन्हावी ता. यावल या दोघांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन चव्हाण करीत आहे.