जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानोरा गावाजवळील गिरणा नदी पात्रात अवैधपणे वाळूचे उत्खनन करून विनापरवाना वाहतूक करून नदी व पर्यावरणाला धोका निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात शिरसोली येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी कारवाई करत ४० हजार रुपये किमतीचे लोखंडी वायर रोप फावडा मशीन तसेच पाच ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धानोरा गावाजवळील गिरणा नदीपात्रामधून अवैधपणे वाळूचा उपसा होत असल्याची माहिती गोपनिय माहिती ग्राम महसूल अधिकारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकासह शनिवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कारवाई केली. यावेळी नदीपात्रात लोखंडी वायर रोप फावडा मशीन आणि ५ ब्रास वाळू आढळून आले. दरम्यान पथकाने वाळूसह इतर सर्व साहित्य जप्त केले आहे. दरम्यान या संदर्भात ग्राम महसूल अधिकारी मयूर महाले यांनी यासंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अवैध उत्खनन करून विनापरवानगी यंत्र वापरून नदी व पर्यावरणाला धोका निर्माण करत वाळू उपसा केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रविवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे हे करीत आहे.