Home क्राईम रावेर परिसरात विना परवाना अवैध गौण खनिज वाहतूक सुरू ; प्रशासनाचे दुर्लक्ष

रावेर परिसरात विना परवाना अवैध गौण खनिज वाहतूक सुरू ; प्रशासनाचे दुर्लक्ष

0
171


 रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरासह परिसरात अवैध गौण खनिज वाहतुकीने उधाण आले असून विना परवाना सुरू असलेल्या वाळू व मुरूम वाहतुकीकडे महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. यामुळे शासनाला दररोज लाखोंचे आर्थिक नुकसान होत असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.

रात्री बारा ते सकाळी आठ या वेळेत ट्रॅक्टर-ट्रॉलींचा सुळसुळाट पहावयास मिळतो. वाळू, मुरूम यांसारख्या गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक निर्भयपणे केली जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अटवाडे आणि रावेर शहरात या वाहनांना अक्षरशः मोकळे रान असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक दिवसांपासून ही वाहतूक सुरू असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यासंदर्भात कोणताही ठोस पाऊल उचललेले नाही.

अवैध खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडे स्वतंत्र यंत्रणा असताना ती जमिनीवर कार्यरत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महसूल अधिकारी आणि पोलिसांनी गंभीरतेने लक्ष न दिल्यामुळे या अवैध व्यवसायाला प्रोत्साहन मिळत असल्याचेही नागरिकांचे निरीक्षण आहे. वाढत्या वाहतुकीमुळे पर्यावरणास हानी तर होतेच, शिवाय रस्ते दुरवस्थेची समस्या अधिक तीव्र होत आहे.

स्थानिकांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी तातडीने हस्तक्षेप करून अवैध खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अवैध वाहतूक थांबविण्यासाठी रात्री गस्त वाढविणे, नाकाबंदी करणे आणि संबंधित ट्रॅक्टर-ट्रॉलींवर तातडीने जप्तीची कारवाई करणे आवश्यक असल्याचे सुचवण्यात येत आहे.


Protected Content

Play sound