जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरातील कंजरवाडा, तांबापूर आणि शिरसोली येथे मोठी मोहीम राबवून अवैध दारू विक्री व तयार करण्याच्या अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत २७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू व दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
ही कारवाई जळगाव शहरातील कंजरवाडा, तसेच ग्रामीण भागातील शिरसोली आणि तांबापुर येथे पहाटे राबवण्यात आली. पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करून गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईदरम्यान १० हजार लीटर दारू तयार करण्याचे रसायन, कच्चा माल आणि एकूण ७ लाख १ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच संपूर्ण गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे.
ताब्यात घेतलेल्या २७ आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेत ११ पोलीस अधिकारी, ४८ पोलीस अंमलदार, २२ होमगार्ड तसेच आरसीपी आणि क्युआरटी पथकाने सहभाग घेतला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी सण उत्सव काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून अशा मोहिमा सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.