Home क्राईम अवैध गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा उघड; डीवायएसपी पथकाची कारवाई

अवैध गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा उघड; डीवायएसपी पथकाची कारवाई


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने रामानंद पोलीस ठाण्याच्या मदतीने शनिवारी ६ डिसेंबर रोजी हरिविठ्ठल नगर परिसरात छापा टाकून एकाला रंगेहात पकडले. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, हरिविठ्ठल नगरातील गोरख महाराज हनुमान मंदिर चौकात एका घरात घरगुती सिलिंडरमधून वाहनांमध्ये किंवा लहान सिलिंडरमध्ये अवैध मार्गाने गॅस भरण्याचा धोकादायक व्यवसाय सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. यापूर्वी जळगावात अशा अवैध रिफिलिंगमुळे गंभीर स्फोट होऊन मनुष्यहानी झाली आहे. या गंभीर धोक्याची दखल घेत सहाय पोलीस अधिक्षक नितीन गणापुरे यांनी स्वतःच्या नियंत्रणाखाली विशेष पथक तयार करून कारवाईचे नियोजन केले. त्यानंतर विशेष पथकाने, ज्यात स.फौ. कैलास सोनवणे, पो.ना. रविंद्र मोतीराया, पो.कॉ. अशोक पुसे तसेच रामानंद नगर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आणि पोलीस ठाण्याचे अंमलदार यांचा समावेश होता, त्यांनी संशयित घरावर छापा टाकला.

छापा टाकल्यावर, संशयित आरोपी शशिकांत शिवाजी मराठे वय ४५ रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव हा घरगुती गॅस सिलिंडरमधून प्रेशर मोटरच्या साहाय्याने दुसऱ्या गॅस हंडीत गॅस भरताना आढळला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरून ३ भरलेल्या गॅस हंड्या, १ गॅस रिफिलिंगसाठी वापरली जाणारी मोटर, १ रेग्युलेटर व अन्य उपकरणे असा लाखो रुपयांचे हे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound