जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातील कोठली रस्त्यावर असलेल्या शाळेत पाच ते सहा डेरेदार निंबाच्या झाडांची कत्तल केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता झाडे तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, हजारो पक्ष्यांचे निवासस्थान उद्ध्वस्त झाले असून, बगळ्यांच्या अंडी व पिल्लांचा जीव गेला आहे.
मुख्याध्यापकांनी झाडे तोडून लाकूड विक्री केल्याचा आरोप आहे. या झाडांवर पक्ष्यांचे घरटे होते, ज्यामुळे पर्यावरणीय नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली होती, मात्र स्थानिक प्रशासन आणि वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे प्रकरण दाबले गेले. बेकायदेशीर बांधकामाचा आरोप करत झाडांची कत्तल केल्यानंतर त्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरू करण्यात आले आहे असा देखील आरोप करण्यात आला आहे.
शाळा प्रशासनाने कोणत्याही नियमानुसार परवानगी घेतल्याचे दिसत नाही. शाळेची तीन मजली मुख्य इमारत आणि सभामंडपासाठी (स्टेज) अधिकृत मंजुरी मिळालेली आहे का, यावर शंका व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी बांधकामाचा कर नगरपालिकेला भरला गेला आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सुज्ञ नागरिकांकडून मुख्याध्यापक आणि शाळेच्या संचालक मंडळावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. परिसरातील ३० वर्षांपासून हुकूमशाही पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तींवर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, झाडे तोडलेल्या जागेवर नवीन झाडे लावण्यास प्रशासनाने सक्ती करावी आणि पर्यावरणाचे पुनर्संवर्धन करावे, अशी मागणी आहे.
या गंभीर प्रकरणात वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. बेकायदेशीर वृक्षतोड, बांधकाम आणि त्यावर दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक प्रशासनावर कारवाईची मागणी जोर धरत आहे. भडगाव येथील ही शाळा दर सहा महिन्यांनी वादाच्या केंद्रस्थानी येत असते. यापूर्वीही शाळेच्या विविध कामकाजांवर अनियमिततेचे आरोप झाले होते. पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. बेकायदेशीर बांधकामांवर प्रतिबंध घालून, संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.