मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेल्या क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमावरीचा अहवाल जाहीर झाला आहे. यात भारतीय विद्यापीठांनी चांगली कामगिरी केली आहे. या क्रमवारीत राज्यातील चार संस्थांनी पहिल्या एक हजार संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. आयआयटी मुंबईने झेप घेतली असून यात ११८ वे स्थान पटकावले आहे. या सोबतच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाने गेल्यावर्षीच्या कामगिरीत सुधारणा करत त्यांचे स्थान उंचावले आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दरवर्षी एक अहवाल प्रकाशित करते. यात जगभरातील शैक्षणिक संस्था, त्यांची कामगिरी, प्रतिष्ठा, शिक्षक, विद्यार्थी गुणोत्तर, प्रति प्राध्यापक संदर्भ, आंतरराष्ट्रीय प्राध्यापक गुणोत्तर व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर यासारख्या विविध निर्देशांकांच्या आधारे विद्यापीठांना क्रमवारी देत असते.
आयटी-मुंबईने २०२४ च्या क्रमवारीत १४९ वरून ११८ व्या स्थानावर झेप घेतली आहे, तर आयआयटी-दिल्लीने जागतिक स्तरावर १५० वे स्थान पटकावले आहे. १३ वर्षांत प्रथमच आयआयटी-मुंबईने क्यूएस रँकिंगमध्ये पहिल्या १५० मध्ये स्थान मिळवले आहे. संस्थेचे संचालक प्राध्यापक शिरेश केदारे म्हणाले, ‘आयआयटी मुंबई या क्रमवारीत आता ११८ व्या स्थानावर आहे, याचा मला आनंद आहे. प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी या सर्वांचे हे यश आहे. भविष्यात आम्ही आणखी सुधारणा करू. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (११८ वे) राष्ट्रीयस्तरावर चांगली कामगिरी केली आहे. आयआयटी मुंबईच्या संशोधनाचा दर्जा आणि प्रतिष्ठेत सातत्याने सुधारणा होत आहे.
गेल्या सहा वर्षांत, रोजगार देण्याच्या रँकिंगमध्ये १०२ व्या स्थानावरून ६३ स्थानावर झेप घेतली आहे. फॅकल्टी रँकिंगमध्ये २२६ व्या स्थानावरून ११६ व्या स्थानावर झेप घेतली आहे. जागतिक स्तरावर वैविध्यपूर्ण संस्था म्हणून संस्थेच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या निकषांमध्ये सुधारणा केली जात आहे. या क्रमवारीत आयआयटी दिल्लीने १५० वे स्थान मिळवले आहे. बेंगळुरूचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) २११ व्या तर आयआयटी मद्रास २२७ व्या स्थानी आहे. आयआयटी कानपूर २६३ व्या तर दिल्ली विद्यापीठ ३२८ व्या स्थानावर या यादीत आहे. आयआयटी मुंबईसह राज्यातील एकूण चार संस्थांनी या यादीत स्थान मिळवले आहे.