अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोहरा येथील साने गुरुजी उपसा सिंचन योजना सुरू करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना अपयश आले असुन या योजनेच्या दुरुस्तीच्या मागणीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसुन येत आहे.
मारवड परिसरासाठी जीवनदायी ठरू शकणारी ही योजना २०११ पासुन नदी पात्रात पाणी नसल्याच्या कारणाने व थकीत विजबिलामुळे बंद पडली होती. माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील यांच्या कार्यकाळात झालेल्या धरणाच्या कामामुळे या योजनेच्या विहिरीजवळ कायमस्वरूपी पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच साहेबराव पाटील यांनी त्यावेळी योजनेचे थकीत वीजबील माफ करवून आणले होते. मात्र विधानसभेची आचारसंहिता लागल्याने दुरुस्तीचे काम रखडले होते. त्यानंतर मात्र नव्या आमदारांनी त्यासंदर्भात आश्वासन देण्यापलीकडे काहीच केलेले नाही.
या योजनेच्या विहिरीत गाळ साचला असुन पाईपलाईन नादुरुस्त झाली आहे. या कामासाठी अंदाजे ८ ते ९ कोटी रुपयांचा निधी लागणार असुन तो उपलब्ध करुन देण्यात स्थानिक लोकप्रतिनिधीना अपयश आले आहे. या योजनेमुळे मारवड परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असती. मात्र आमदारांनाच या कामाचा विसर पडला असल्याने या योजनेचे भविष्य अधांतरी लटकले आहे. आजच निवडणूक आयोगाने राज्यात दुष्काळी कामांसाठी आचारसंहीता शिथिल केली आहे. त्यामुळे आता तरी याबाबत लवकरात लवकर हालचाल करून हा प्रश्न त्यांनी मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.