अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शहरात पाणी पुरवठा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. येत्या काळात मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा, मुस्लिम बांधवांचा रमजान महिना, लग्न सराई सुरू असून प्रत्येक नागरिकांकडे पाहुणे आले असतात. दुसरीकडे कडक उन्हाळा सुरू असून पाणी पुरवठा विभाग कधी आठ दिवसात तर कधी दहा दिवसात पाणी पुरवठा करते. त्यात ही वेळेचे नियोजन नाही कधी सकाळी कधी दुपारी तर कधी रात्री तेही कमी दाबाने पाणी पुरवठा करतात.
नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच व्हालमन यांच्यात ताळमेळ नसून दुसरीकडे नागरिक पाण्याच्या टाकीवर फोन करतात ते उचलले जात नाही उचलले तर कर्मचारी उर्मटपणे उत्तरे देतात तरी येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास प्रभागातील नागरिकांसह हंडा मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन मुख्याधिकारी तथा मुख्यप्रशासक तुषार नेरकर पाणी पुरवठा अभियंता बैसाने साहेब यांना नगरसेविका कमलबाई पिंताबर पाटील आणि रवि पाटील यांच्यातर्फे देण्यात आले.