जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जळगाव ग्रामीण उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक भागांतील शेती पाण्याखाली गेली असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कानळदा, भोकर परिसरासह विविध गावांमध्ये मका, गहू, हरभरा, ज्वारी तसेच केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभे केलेले पीक एका झटक्यात उद्ध्वस्त झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी प्रा. भाऊसाहेब सोनवणे आणि सौ. दिपाली भाऊसाहेब सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी दिल्या. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पीक विमा, कर्जफेड आणि रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी यावेळी मांडली.
दिपाली सोनवणे यांनी शासनाकडे मागणी करताना सांगितले की, तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे. अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल. प्रशासनाने विलंब न करता तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी इशारा देताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलन उभारले जाईल. शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत असताना शासनाने केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष मदतीची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.



