अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास कोणत्याही परिक्षेत यश निश्चित-निरज अग्रवाल

अमळनेर (वृत्तसंस्था) जीवनातील सर्वच क्षेत्रातील यशासाठी अभ्यास महत्त्वाचा असून अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास कोणत्याही परिक्षेत यश निश्चित मिळते. त्यासाठी परिश्रमाची तयारी ठेवावी असे प्रतिपादन खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष निरज अग्रवाल यांनी केले. प्रताप तत्वज्ञान केंद्र येथे आयोजित दहा दिवसीय सेट/नेट परिक्षा पुर्वतयारी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.आर.चौधरी होते.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व प्रताप तत्वज्ञान केंद्र यांच्या वतीने तत्वज्ञान केंद्र येथे दि.२१ ते ३० मार्च या कालावधीत नेट/सेट परीक्षेच्या पहिल्या पेपरचे मार्गदर्शनासाठी मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा.धिरज वैष्णव यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भुमिका व्यक्त केली. नेट/सेट या अत्यंत महत्त्वाच्या परिक्षेत यश मिळविण्यासाठी परीक्षार्थिंना योग्य मार्गदर्शन मिळावे ,यासाठी विद्यापीठाने आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिली आहे असे सांगितले. विद्यार्थी वर्गासाठी महत्त्वाची व आयुष्याची दिशा बदलणारी नेट/सेट या परिक्षेत ग्रामीण भागात योग्य मार्गदर्शनाचा अभाव दिसून येतो. अशा प्रकारच्या कार्यशाळेतून यश मिळविण्यास निश्चित मदत होईल असे मनोगत सिनेट सदस्य दिनेश नाईक यांनी व्यक्त केले.

 

निरज अग्रवाल यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील अनुभव सांगितले. आपण केवळ प्राध्यापक होण्यासाठी नव्हे तर शिक्षण क्षेत्रातील इतर मोठ्या संस्थामध्येही नेट/सेट परीक्षेच्या माध्यमातून कार्य करू शकतो. अभ्यासाचे योग्य नियोजन,परिश्रमाची तयारी,स्वतःप्रती प्रामाणिक रहावे यश आपल्यालाच मिळेल असे सांगितले. प्रा.डॉ. राधिका पाठक यांनी आपले अभ्यासाचे अनुभव व्यक्त करून यशासाठी महत्वाच्या टिप्स दिल्या.प्राचार्य डॉ. एस.आर.चौधरी यांनी तत्वज्ञान केंद्र येथे आगामी काळातील उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थी व अभ्यासकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन केले. याप्रसंगी उपस्थित मार्गदर्शक श्री निखील बैसाणे,पंकज पाटील,प्रा. डी.आर.चौधरी, प्रा. विजय तुंटे ,प्रा. जितेंद्र पाटील, प्रा. निलेश चित्ते, प्रा. योगेश तोरवणे, प्रा. कृष्णा संदानशिव, प्रा. पवन पाटील ,प्रा. डी.आर.पाटील डॉ.स्वप्निल खरे, मेघागौरी घोडके यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रारंभी प्रा. हेमलता नवाटे यांनी” बलसागर भारत होवो” हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघागौरी घोडके तर आभार प्रदर्शन डॉ.स्वप्निल खरे यांनी केले. कार्यशाळेस अमळनेर तालुक्यासह परिसरातील तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दररोज सकाळी १०:३० ते ४:३० या वेळेत कार्यशाळा घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तत्वज्ञान केंद्राचे हिंमत पाटील,रंजना फालक,संदीप पाटील,बापू पाटील,अशोक चौधरी,गोपाल माळी,हरिष चौधरी,युनूस मेहतर आदींनी परिश्रम घेतले.

Add Comment

Protected Content