मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. तब्बल २५७ निष्पाप नागरिकांचा बळी घेतलेल्या या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सरकारी वकील आणि अलीकडेच राज्यसभा सदस्य म्हणून नामांकित झालेले उज्ज्वल निकम यांनी एक गंभीर आणि खळबळजनक दावा केला आहे.
एका विशेष मुलाखतीत एनडीटीव्हीशी बोलताना निकम म्हणाले की, जर अभिनेता संजय दत्तने शस्त्रांनी भरलेल्या व्हॅनची माहिती पोलिसांना दिली असती, तर १९९३ चे साखळी बॉम्बस्फोट टाळता आले असते. निकम यांच्या या वक्तव्यामुळे देशात पुन्हा एकदा त्या काळातील चर्चित प्रकरणावर नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

निकम यांनी सांगितले की, स्फोटांच्या एक दिवस आधीच अबू सालेम संजय दत्तच्या घरी शस्त्रसाठा घेऊन पोहोचला होता. त्या व्हॅनमध्ये हँडग्रेनेड, एके-४७ बंदुका असा मोठा साठा होता. संजय दत्तने त्यातून काही शस्त्रे उचलली, नंतर परत केली, पण एक एके-४७ स्वतःजवळ ठेवली. हा प्रकार पोलिसांना कळू दिला गेला नाही आणि त्याचे गंभीर परिणाम देशाने भोगले, असे निकम म्हणाले.
निकम पुढे म्हणाले, “संजय दत्त निर्दोष आहे असं म्हणायचं नाही, पण त्याच्याकडे बंदूक ठेवण्याची आवड होती. त्याने कायद्याचा भंग केला हे नक्की. मात्र तो दहशतवादी नव्हता. त्यामुळे त्याला टाडा अंतर्गत दोषी ठरवण्यात आले नाही. फक्त शस्त्र बाळगल्याबद्दल त्याला शिक्षा झाली. सर्वोच्च न्यायालयाने त्याची ६ वर्षांची शिक्षा कमी करून ५ वर्षांची केली.”
१९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर काही आठवड्यांतच संजय दत्तला अटक झाली होती. अबू सालेम आणि रियाज सिद्दीकीकडून बेकायदेशीर बंदुका घेतल्याचा, त्या बाळगल्याचा व नष्ट केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. विशेष टाडा न्यायालयात सादर झालेल्या पुराव्यांनुसार या शस्त्रांचा वापर स्फोटांदरम्यान करण्यात आला होता, असं मानलं गेलं.
दरम्यान, १२ मार्च १९९३ रोजी मुंबईतील विविध भागांमध्ये १३ साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते. या हल्ल्यांमध्ये २५७ लोक ठार झाले तर ७०० हून अधिक जखमी झाले होते. संपूर्ण देश हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतरचा तपास आणि त्यातून उघडकीस आलेले धक्कादायक तपशील आजही देशवासीयांच्या स्मरणात आहेत.
उज्ज्वल निकम यांचा दावा केवळ चर्चेचा विषय ठरत नसून, १९९३ च्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात संजय दत्तच्या भूमिकेवर नवे प्रश्नचिन्ह निर्माण करतो. त्यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा त्या काळातील घटनांचा राजकीय आणि सामाजिक आढावा घेतला जात आहे.



