मोदी सत्तेत आल्यास शांतता चर्चा शक्य – इम्रान खान

download 3

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे, असे म्हटलं आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणे अशक्य असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. राजकीय पक्षांकडून टीका होईल, या भीतीने काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असे इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

 

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व घडामोडींनंतर आता इम्रान खान यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास शांततेच्या चर्चेला प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं आहे.

‘भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं. जर आम्ही उत्तर दिलं नसतं तर लोकांकडून आमच्यावर प्रचंड टीका झाली असती. जर उत्तर दिलं नसतं तर कोणतंही सरकार पाकिस्तानात टिकू शकत नाही’ असं काही ठराविक प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे. तसेच दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. एका वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्याने बाराहून अधिक दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहितीही यावेळी दिली.

Add Comment

Protected Content