जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईच्या आंदोलनात 3 कोटींपेक्षा कमी मराठे मुंबईत आले तर माझे नाव बदलून ठेवा असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे 26 तारखेपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. यावेळी कोट्यवधींच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत येतील असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तसेच आरक्षण देण्याच्या नावाखाली सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला आहे.
जरांगे म्हणाले, ”आजित पवार मराठा आंदोलकांवर कारवाईची भाषा करत आहेत. त्यांनी आमच्या आंदोलकांवर कारवाई करूनच दाखवावी. आम्ही आमच्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने मुंबईला येत आहोत, आणि आरक्षण घेतल्या शिवाय आम्ही परत जाणार नाही. मला मरण आल तरी चालेल पण मराठ्यांना न्याय देऊनच मरेल. त्यामुळे सरकारने भानावर यावं”, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
पुढे जरांगे म्हणाले, ”मुंबईला येण्याची वेळ येणार नाही असे सरकार म्हणते. पण आम्हाला वाटते मुंबईला जाण्याची वेळ येणारच आहे. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कारण आता किती दिवस वाट बघणार आणि सरकारला किती मुदतवाढ देणार”, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. तसेच पत्रकार परिषद घेऊन येत्या 15 तारखेला आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याची माहितीही मनोज जरांगे यांनी दिली आहे.
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईतील २० जानेवारीच्या मोर्चावर ठाम आहेत. मुंबईत 144 कलम लागू करण्यात आले तरी मुंबईत जाणारच असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने आधी 18 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू केली होती. त्यामुळेच आपण 20 जानेवारीच्या मोर्चाचे नियोजन केले. मात्र आता सरकारने 144 कलमाला मुदतवाढ दिल्यामुळे जरांगेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुंबईत 9 फेब्रुवारीपर्यंत विविध बंधनं घालण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दरम्यानच मनोज जरांगे मुंबईत मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे या बंधनांवरून वाद पेटण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी टिकात्मक गाणी गाणे, संगीत वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच कुणाच्याही प्रतिमा किंवा पुतळ्यांसोबत निदर्शनं करण्यास आळा घालण्यात आला आहे. मनोज सारंगे पाटील यांच्या आंदोलना दरम्यान बीडमध्ये हिंसक वळण लागले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी म्हणून मुंबईतही ही बंधनं लादली आहेत.
मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीनंतर लाखो समर्थकांसह मुंबईत धडक देणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी विनंती हेमंत पाटील यांनी दाखल केली होती. मात्र शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने ती याचिका दाखल करून घेण्यास स्पष्ट नकार दिला.