नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी व्हावे. जर पक्ष सरकारमध्ये सहभागी होण्यात अपयशी ठरला तर, महाराष्ट्रात काँग्रेस संपेल, असा इशाराच या नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिला असल्याचे वृत्त आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोमवारी प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर जोर दिला. अस्तित्वाच्या लढाईत सरकारमध्ये सहभागी होणे पक्षासाठी फायद्याचे आहे, असे मतही या नेत्यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार सरकारमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत, असे या नेत्यांनी अध्यक्षा सोनिया गांधींना सांगितले. स्वच्छ प्रतिमा आणि स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो आहोत, असे या आमदारांचे म्हणणे आहे. निवडून आल्याने काही आमदार आक्रमक झाले आहेत, असे सांगून त्यांनी एकप्रकारे आमदार फुटण्याच्या शक्यतेकडेही लक्ष वेधले. या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, रजनी पाटील आदी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी देखील शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत सूचवले आहे.