मुंबई-वृत्तसेवा । राज्यातील सुमारे २९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची अद्याप अपार (APAAR) आयडी नोंदणी पूर्ण झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी तातडीने ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत. एकीकडे राज्यात सुरू असलेल्या विविध महानगरपालिका निवडणुकांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली असताना, दुसरीकडे अपार आयडी नोंदणीचे कामही युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिल्याने शिक्षकांवर मोठा ताण आला आहे.

विद्यार्थ्यांचे डिजिटल ट्रॅकिंग, शैक्षणिक प्रगतीचे निरीक्षण तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विविध उपक्रमांचे संनियंत्रण करण्यासाठी अपार आयडी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. ही नोंदणी यू-डायस प्लस (UDISE Plus) प्रणालीमार्फत करण्यात येत असून, याबाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

यू-डायस प्लस प्रणालीच्या १ जानेवारी २०२६ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील एकूण १८ कोटी ४२ लाख २१ हजार विद्यार्थ्यांपैकी ८५.५ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. तसेच २० कोटी ४ लाख ८२ हजार म्हणजेच सुमारे ९५ टक्के विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झाले असल्याचेही या अहवालातून स्पष्ट होते.
मात्र, शाळांतील पूर्वप्राथमिक आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या अपार आयडी नोंदणीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. अहवालानुसार २९ लाख ८ हजार विद्यार्थ्यांची अद्याप अपार आयडीसाठी नोंदणीच झालेली नाही, ही बाब शिक्षण विभागासाठी चिंतेची ठरत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत राज्यातील विद्यार्थ्यांच्या अपार आयडी निर्मितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून या कामाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आयडी देण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, त्यासाठी यू-डायस प्रणालीमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या एका महिन्यात प्राधान्याने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्यात यावेत, असेही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे.
निवडणूक कामकाज आणि अपार आयडी नोंदणी या दोन्ही जबाबदाऱ्या एकाचवेळी पार पाडताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, पुढील काही दिवस शिक्षण यंत्रणेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.



