एरंडोल (प्रतिनिधी) शहरातील एका परिवाराने महात्मा फुले यांच्या प्रेरणेतून आपल्या मुलाचा लग्न सोहळा नुकताच सत्यशोधक पद्धतीने पार पाडला आहे. या विवाह सोहळ्यात बडेजावपणा न करता अनाथ मुलांना विशेषरित्या आमंत्रित करून स्नेहभोजन देण्यात आले.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील मारोती मढी परिसरातील तसेच महाजन फोटो स्टुडिओचे संचालक गणेश शिवराम महाजन यांचा मुलगा दिनेश महाजन याच्यावर लहानपणा पासूनच शिक्षणाचे जनक महात्मा फुले यांच्या विचारांचा पगडा होता. म्हणूनच सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्याची इच्छा होती. दिनेशने ही इच्छा आपल्या वाडीलांसमोर मांडली. लग्नात होणारा भला मोठा खर्च न करता सत्यशोधक पध्दतीने लग्न करून अनाथ मुलांना आपल्या लग्नात आमंत्रित करून त्यांना जेऊ घालू. आपल्या मुलाचे विचार ऐकून गणेश महाजन यांनी सत्यशोधक पध्दतीने लग्नास होकार दिला. तसेच मुलीकडील मंडळीला देखील यासाठी तयार केले. मुलीकडील मंडळीचा होकार मिळाल्यावर दि.27 मार्च रोजी हा लग्न सोहळा मोठया उत्साहात पार पडला. या लग्न सोहळ्यात मोठ्या संख्येने नातेवाईकासह समाज बांधव तसेच शहरातील मान्यवर उपस्थित होते. या विवाह सोहळ्याचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले.