चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सामाजिक बांधिलकी व गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी झटणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याची परंपरा रोटरी क्लबने यंदाही जपली आहे. रोटरी क्लब ऑफ चोपडा मार्फत सन 2025 साठी “नेशन बिल्डर अवॉर्ड” देण्यात आला असून, या पुरस्कारासाठी बालमोहन विद्यालय चोपडा येथील आदर्श शिक्षिका सौ. रोहिणी भास्करराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत रोटरी क्लबने त्यांचा गौरव केला.
रोटरी ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची सामाजिक संस्था असून, जगभरातील 210 देशांमध्ये रोटरीचे कार्य अविरत सुरू आहे. “सेवा हेच आमचं धर्म” हे ब्रीद अंगीकारत रोटरी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सन्मानित करत असते. याच परंपरेनुसार रोटरी क्लब चोपडा तर्फे दरवर्षी नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान करण्यात येतो, जो यंदा सौ. रोहिणी शिंदे यांना देण्यात आला.

रोहिणी शिंदे या कापडणे येथील मूळ रहिवासी असून, अमळनेर पंचायत समितीचे सेवानिवृत्त कर्मचारी भास्करराव शिंदे यांच्या कन्या आहेत. बालमोहन विद्यालयात त्या एक प्रेरणादायी शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. विद्यार्थ्यांसोबतचे त्यांचे संवेदनशील व प्रेरणादायी वर्तन, शिक्षणातील नवनवीन उपक्रमांची अंमलबजावणी आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत रोटरी क्लबने त्यांना “आदर्श शिक्षक” हा विशेष पुरस्कार देऊन गौरविले.
या सन्मानप्राप्तीमुळे बालमोहन विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चेअरमन चंद्रकांतजी पाटील, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्र परिवाराकडून सौ. शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एक आदर्श शिक्षिका म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात जी उंची गाठली आहे, ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
सौ. रोहिणी शिंदे यांचा हा सन्मान हा शिक्षण क्षेत्रातील समर्पित कार्याची पावती असून, त्यांनी आपल्या कार्यातून समाज घडविण्याच्या प्रक्रियेला चालना दिली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या कार्याचा व्यापक प्रभाव भविष्यातही जाणवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.



