चोपडा ( प्रतिनिधी ) तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे पाण्याची पातळी कमालीने घसरत आहे. पाण्यासाठी होणारी भटकंती पाहता सर्व सामान्य नागरिकांची जबाबदारी म्हणून प्रत्येकाने एक झाड जगवायला हवे, या विचाराने प्रेरित होवून येथील प्रसाद नगरच्या शशिकांत नगर शेजारी गरताड रोडवरील जगदीश प्रेमचंद लोढा, सौ. सुनीता लोढा या अपंग दांपत्याने एक आदर्श निर्माण करत भारतीय जैन संघटनेच्या मदतीने परिसरात झाडे लावण्याचा संकल्प केला.
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत पूर्व संध्येला म्हणजे दि ३० एप्रिलला झालेल्या या कार्यक्रमाला पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, नगरपालिकेचे गटनेते जिवन चौधरी, भारतीय जैन संघटनाचे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल कोचर, विभागीय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन, तालुका अध्यक्ष क्षितिज चोरडिया, सचिव दिनेश लोडाया, सहसचिव चेतन टाटीया, उपाध्यक्ष विपुल छाजेड, सल्लागार दीपक राखेचा, जेष्ठ सद्स्य धिरेंद्र जैन, संदीप बेदमुथ्था, सामाजिक कार्यकर्ते अशोक मराठे आदी उपस्थित होते. यावेळी परिसरात बरीच झाडे लावण्यात आली. चंद्रहास गुजराथी यांनी ह्या अपंग दांपत्याचे कौतुक केले तसेच यांचा आदर्श चोपडा शहरातील प्रत्येक नागरिकांनी घ्यावा, असे म्हटले. न.पा. गटनेता जीवन चौधरी यांना सांगितले की, नगरपालिकेतर्फे शहरातील प्रत्येक खुल्या जागी झाडे लावावी आणि ती झाडे जगवण्याची जबाबदारी परिसरातील नागरिकांना दयावी. त्यावर शशिकांत नगरातील रहिवाशांनी आश्वासन दिले की, नगरपालिकेने सुरुवात आमच्या कॉलनीपासून करावी, आम्ही त्या झाडाचे संगोपन करू.