शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्या दिवशी योग्य निर्णय घेईन – मंत्री अब्दुल सत्तार

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेशी माझा प्रासंगिक करार आहे. ज्या दिवशी शिंदेंचा माझ्यावरील विश्वास उडेल त्या दिवशी मी योग्य तो निर्णय घेईन, असे विधान करून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री अब्दुल सत्तार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.

अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी जालना लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त विधान करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून वेगळे होण्याचे संकेत दिलेत. माझा शिवसेनेसोबत प्रासंगिक करार आहे. ज्या दिवशी शिंदे यांचा माझ्यावरील विश्वास संपेल त्या दिवशी मी योग्य तो निर्णय घेईन. आमच्यातील करार संपुष्टात येईल, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे व माझ्यात आजही चांगले संबंध आहेत. 2019 मध्ये जे काही घडले त्याचे सूत्रधारही शिंदेच होते. तेव्हा ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे काम केल्याचा दावा केला. पण सोबतच आपल्या मनात काँग्रेस उमेदवार कल्याण काळेच होते असेही स्पष्ट केले. जालना लोकसभा मतदार संघात मी महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यासाठी काम केले. पण माझ्या मनात कल्याण काळे होते. माझ्या सिल्लोड मतदार संघातून दानवेंना चांगले मताधिक्य मिळाले नसल्याचा आरोप होतो. पण दानवेंना त्यांच्या भोकरदनमधूनही चांगली मते मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे, असे ते म्हणाले. अब्दुल सत्तार यांनी यावेळी आपल्या काही कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळेंसाठी काम केल्याचेही प्रांजळपणे कबूल केले. माझ्या काही कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांना मदत केल्याचे मला मान्य आहे. कारण दानवेंनी मला विधानसभेत मदत न केल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली होती. याची कल्पना मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिली होती. रावसाहेब दानवे माझे जवळचे मित्र आहेत, पण कल्याण काळे माझ्या मनातील मित्र आहेत, असे सत्तार म्हणाले.

Protected Content