मुंबई (वृत्तसंस्था) राज ठाकरेंची सभा नकोय, असे कुणाला वाटेल ? असे म्हणत काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी अप्रत्यक्षपणे विनंती केली आहे. तसेच, राजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल,असे देखील म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी आपले मत मांडले.
काँग्रेसकडून मुंबई उत्तर मतदार संघातून मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांस लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मुंबई उत्तर मतदार संघात २८ टक्के मराठी मतदार आहेत. मराठी मतांवर डोळा ठेवूनच काँग्रेसने उर्मिलाला उमेदवारी दिले असून उर्मिलाही मतदारांशी मराठीतून संवाद साधताना दिसत आहे. त्यामुळे मराठीचा मुद्दा उर्मिलासाठी फायद्याचा ठरणार हे निश्चितच आहे. मनसेने लोकसभेसाठीची आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. त्यामुळे मनसेकडून उर्मिलाला मदत मिळणार का?, मराठमोळ्या उर्मिलाच्या पाठिशी मनसे सैनिक पूर्ण ताकतीने उभे राहतील का?, असे अनेक प्रश्न मेळाव्यापूर्वी उपस्थित होत होते. मराठीच्या मुद्दावर मनसेने उर्मिलाला पाठिंबा दिल्यास लोकसभा निवडणुकीसाठीचा तिचा मार्ग काही अंशी सुकर होणार आहे. आता, उर्मिलानेही राजसाहेबांनी सभा घेतल्यास अत्यानंद होईल, असे म्हटले.