चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनेक तरुण बेरोजगारीमुळे व्यसनाधिन होत आहेत. वैफल्यग्रस्ततेतून हे तरुण व्यसनाकडे वळले आहेत. परंतू ही परिस्थिती बदलवायची असल्यामुळेच मला आमदार व्हायचंय, असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार डॉ. विनोद कोतकर यांनी केले आहे. ते ग्रामीण भागात मतदारांशी संवाद साधत होते.
विधानसभा मतदार संघातील सुशिक्षित, सुसंस्कृत असे अपक्ष उमेदवार डॉक्टर विनोद कोतकर यांनी ग्रामीण भागात प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. गावागावात त्यांचे जंगी स्वागत होत आहे. याचवेळी डॉक्टर विनोद कोतकर यांनी तळमळीने सांगतात की, तालुक्यातील अनेक तरुण व्यसनाच्या नादी लागून व्यसनाधिन होत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना हाताला नसलेला रोजगार. याच वैफल्यग्रस्ततेतून हे तरुण व्यसनाकडे वळले आहेत. याचा परिणाम त्यांचा परिवार आणि समाजामध्ये दिसून येतो. ही सामाजिक वैफल्यग्रस्तता दूर करण्यासाठी तसेच या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न राहणार आहेत. यातून समाजामध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याची आपली इच्छा असल्याचे डॉक्टरांनी बोलून दाखवले. तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासन स्तरावरील योजना तळागाळापर्यंत राबवण्यासाठी मला लोकप्रतिनिधी होऊन आमदार व्हायचे आहे. यासाठीच मतदार बंधू-भगिनींनी मला निवडून द्यावे, असे आवाहन डॉक्टर विनोद कोतकर यांनी केले आहे.