मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच, त्यांनी स्वतः व्यासपीठावरून केलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आले आहे. “माझी गॅरेंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही,” असे वक्तव्य त्यांनी थेट व्यासपीठावरून केले.
जयंत पाटील हे सध्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, या आंदोलनादरम्यान बोलताना त्यांनी हे विधान केले. त्यांनी मिश्किलपणे सांगितले की, “राजू शेट्टी यांनी जो झेंडा हाती घेतला तो कधी सोडलेला नाही. मात्र माझी गॅरेंटी घेऊ नका, कारण तुम्हाला माझ्याबद्दल शंका असते. त्यामुळे मी हमी देणं धोक्याचं आहे.”
काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. या भेटीत दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली होती. ही भेट मुंबईतील बावनकुळे यांच्या बंगल्यावर झाली असून, त्यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले होते की, “जयंत पाटील सांगली जिल्ह्यातील महसूल खात्याशी संबंधित काही विषय घेऊन आले होते. 14-15 विकासकामांबाबत त्यांनी चर्चा केली. या चर्चेत कोणताही राजकीय संदर्भ नव्हता.” मात्र तरीही जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही.
जयंत पाटील यांच्या “माझं काही खरं नाही” या वक्तव्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे विधान त्यांनी राजू शेट्टी यांच्या संदर्भात केल्याचे दिसत असले, तरी अनेक राजकीय विश्लेषक त्याचा संबंध त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाशी लावत आहेत. आगामी काही दिवसांत या चर्चांना कोणता दिशा मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.