कणकवली, वृत्तसंस्था | “राष्ट्रवादीत राहायला कोणी तयारच नाही, शरद पवारांची अवस्था शोलेतल्या जेलरसारखी झाली आहे,” पाच वर्षात जे केले त्याचा हिशोब देण्यास मी तयार आहे, तुम्ही १५ वर्षांचा हिशोब द्या, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिले. कणकवलीत भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.
काँग्रेसच्या जागा कमी करण्यात राहुल गांधींची मदत नक्की मिळेल, अशी खिल्लीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडवली आहे. “राहुल गांधींना आपण महाराष्ट्रात येऊन कितीही डोकं आपटलं तरी काही फरक पडणार नाही, हे माहिती होतं म्हणून ते बँकॉकला फिरायला गेले होते,” असाही टोला यावेळी त्यांनी लगावला.
“राहुल गांधी महाराष्ट्रात नाहीत, मला वाटलं हरियाणात असतील, पण तिथेही नव्हते. म्हटलं दिल्लीला असतील पण तिथेही नव्हते. वायनाड गेले असावेत असं वाटलं पण तिथेही नव्हते. चौकशी केली असताना ते बँकॉकला गेले असल्याचं कळलं. त्यांच्या नेत्यांना फोन करुन महाराष्ट्रात या, अशी विनंती करावी लागली. आम्ही कोणता चेहरा घेऊन लोकांसमोर जाणार ? असा प्रश्न नेते विचारत होते,” असेही फडणवीस म्हणाले. “काँग्रेसचे ४२ ते २४ होतील हे त्यांना माहिती आहे,”असा टोलाही फडणवीस यांनी मारला. तसेच राहुल गांधींची सभा झाल्याने मला आनंद झाल्याचेही त्यांनी म्हटले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास व्यक्त करत एकूण मतदानाच्या ६० ते ७० टक्के मतं त्यांना मिळतील, असा दावाही केला. देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना यावेळी संयम बाळगण्याचा सल्ला दिला. “नितेश राणे आक्रमक आहेत, कारण ते नारायण राणेंच्या नेतृत्त्वात घडले आहेत. पण नितेश राणे यांना आता आमच्या शाळेत घेतलं आहे. त्यांना आमच्या शाळेत संयम शिकवणार आहोत. नारायण राणे जिथे आक्रमक व्हायचे तिथे होतात, संयम बाळगायचा तिथे बाळगतात,” असे यावेळी त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात निवडणुकीत कुठेही चुरस दिसत नाही असं यावेळी फडणवीसांनी सांगितलं. ही निवडणूक प्रेमाने, जनतेसोबत लढली पाहिजे असं सांगताना अनेक लोक चिथवण्याचा प्रयत्न करतील. जे जिंकणारे असतात त्यांनी वाघासारखं, मोठ्या मनानं वागायचं असतं, असा सल्लाही यावेळी फडणवीस यांनी दिला.