मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला परभवाचा धक्का बसला. पराभवानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पराभावामागची कारणं काय? हे शोधण्याचं काम सुरु आहे. यातच विरोधकांकडून ईव्हीएमबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. अशातच आज शिवसेना ठाकरे गटात मनसेच्या घाटकोपरमधील काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपली निशाणी बदलली तरीही मी महाराष्ट्रात जेव्हा फिरत होतो तेव्हा सगळे मला म्हणत होते उद्धवजी तुम्हीच येणार. मला गंमत वाटते की जे काही सर्व्हे चालले होते, त्यात जनतेच्या मनतला मुख्यमंत्री कोण होता? मीच होतो. मग त्याची दांडी कशी उडाली? कारण हे सगळं चोरांचे आणि दरोडेखोरांचे राज्य आहे. हे राज्य आता आपल्याला उलथवून टाकावं लागेल. एक ठिणगी तर पडली आहे. मागच्या रविवारी मी बाबा आढाव यांच्या उपोषण स्थळी गेलो होतो. आता तुम्हाला झोपून चालणार नाही. हा मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्तित्त्वाचा प्रश्न आहे. योग्यवेळी तुम्ही मशाल हाती घेतली आहे, शिवसेनेचा भगावा हाती घेतला आहे. आता तुमचे जे काही प्रश्न आहेत, जिथे तुम्हाला मदत लागेल तिथे तुमच्या बरोबर मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा असेन एवढी ग्वाही देतो”, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटले.