जळगाव प्रतिनिधी । पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून पाण्यात बुडवून मारणाऱ्या पतीला तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वावडदा येथील रहिवासी प्रकाश सुकलाल भिल (वय-४४) ह.मु. शेंदुर्णी ता. जामनेर यांचा विवाह मंगलाबाई भिल यांच्याशी झाला होता. त्यांचा संसारवेलीवर दोन मुले व एक मुलगी असा परिवार होता. दरम्यान प्रकाश सुकलाल भिल याने पत्नीला किरकोळ कारणावरून नेहमी शारीरिक व मानसिक छळ करत होता. १ जून २०२ रोजी पत्नी मंगलाबाई हिला मासे पकडण्याचा बहाणा करून जंगिपुरा शिवारातील सोन नदीमध्ये घेऊन गेला आणि त्याच ठिकाणी मंगलाबाई यांना बुडवून ठार मारले. यासंदर्भात मयत विवाहितेचा भाऊ गजानन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात प्रकाश सुकलाल भिल याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा खटला जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालला. यात सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात मयताची मुलगी, मुलगा तसेच तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. प्रकाश भिल याला न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांनी दोषी ठरवत भारतीय दंड विधान कलम (४९८- अ ) नुसार तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, आणि दंड न भरल्यास तीन महिन्याचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या कामी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील प्रदीप महाजन यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून अनिल देवरे यांनी सहकार्य केले.