जळगाव प्रतिनिधी । पत्नीला मारहाण करून खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांनी दिला आहे.
अनिल चावदस सपकाळे वय ३० रा. शिक्षक कॉलनी जामनेर असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, ३ फेब्रुवारी रोजी जामनेर येथे शिक्षक कॉलनीत अनिल चावदस सपकाळे याने त्याची पत्नी मनिषा सपकाळे हिच्या डोक्यात मारहाण करत गंभीर दुखापत केली. उपचार सुरु असतांना दुसर्या दिवशी ४ फेब्रुवारी मनिषा हिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मनिषाची आई प्रभाबाई निना कोळी यांच्या फिर्यादीवरुन जामनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा न्यायालयात प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांच्या न्यायालयात हा खटला चालला. खटल्यात १५ जणांची साक्षी नोंदविण्यात आले. यात गुरुवारी खटल्यात निकालावर कामकाज झाले. संशयित अनिल सपकाळे यास दोषी धरत न्यायालयाने त्यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ऍड. प्रदीप महाजन यांनी प्रभावी युक्तीवाद केला. खटल्याकामी केसवॉच पोलीस कॉन्स्टेबल सोनसिंग डोभाळ आणि कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र सैंदाणे यांचे सहकार्य लाभले.