Home Cities अमळनेर पत्नीवर जीवघेणा हल्ला प्रकरणी पतीला ७ वर्षे सश्रम कारावास  

पत्नीवर जीवघेणा हल्ला प्रकरणी पतीला ७ वर्षे सश्रम कारावास  


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पत्नीवर संशय घेऊन धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणात अमळनेर येथील न्यायालयाने आरोपी पतीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने आरोपीस दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही घटना नोव्हेंबर २०२३ मध्ये घडली होती. या प्रकरणात सरकारी पक्षाने सादर केलेल्या साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान रामदास शिंपी (वय ६०, रा. ताडेपुरा, पैलाड, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सत्र खटला क्रमांक २८/२०२४ असा होता.

नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी महिला दिवसभर मजुरीचे काम आटोपून घरी आली होती. त्या वेळी ती आपल्या मुलगी रोशनी हिच्याशी फोनवर बोलत असताना तिचे पती भगवान शिंपी घरी आले. पत्नी कोणाशी बोलत आहे, असा संशय घेत त्यांनी शिवीगाळ करत तिच्या चारित्र्यावर आरोप केले आणि ‘आज तुला मारून टाकतो’ अशी धमकी देत घराबाहेर निघून गेले.

या घटनेनंतर घाबरलेल्या फिर्यादीने पैलाड नाक्यावरील ओळखीचे रवि टेलर यांच्या दुकानावर जाऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी त्यांनी सकाळी पाहू असे सांगून तिला घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी पुन्हा घरी आला आणि घरासमोर बसलेल्या पत्नीला पाहताच शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिला जमिनीवर पाडून पॅन्टच्या खिशातून धारदार चाकू काढून तिच्या गळ्यावर वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादीने स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिकार केला असता झटापटीदरम्यान आरोपीने तिच्या दोन्ही हातांवरही चाकूने वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान, तिचा मुलगा गणेश कामावरून घरी आला आणि परिसरातील नाना चौधरी तसेच इतर नागरिक जमा झाल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. जखमी महिलेला तिच्या मुलाने आणि शेजाऱ्यांनी मोटारसायकलवरून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश-तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे अॅड. के. आर. बागुल मंगरूळकर यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी पत्नीची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रवि टेलर, ज्ञानेश्वर संतोष, पंच साक्षीदार आणि अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रकाश ताडे यांच्या साक्षींमुळे प्रकरण अधिक स्पष्ट झाले.

फिर्यादीच्या गळ्यावर, मानेवर, हनुवटीवर आणि हातांवर झालेल्या जखमांच्या वैद्यकीय अहवालावरून आरोपीने जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. सरकारी वकील के. आर. बागुल यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी भगवान शिंपी यांना भारतीय दंड विधान कलम ३०७ अंतर्गत दोषी धरत सात वर्षे सश्रम कारावास दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन वर्षे कारावास एक हजार रुपयांचा दंड अशी अतिरिक्त शिक्षा ठोठावली.

या खटल्याच्या कामकाजात पोलीस हेडकॉन्स्टेबल पुरुषोत्तम वाल्डे (केस वॉच), पीएसआय उदयसिंग सांळुके (पारोळा पोलीस ठाणे), पोलीस कॉन्स्टेबल राहुल रणधीर (चोपडा ग्रामीण), पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील (चोपडा शहर), पोलीस कॉन्स्टेबल सतीष भोई (अडावद) आणि पोलीस कॉन्स्टेबल भरत इशी (मारवड) यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.


Protected Content

Play sound