जळगाव प्रतिनिधी | कौटुंबिक वादातून झालेल्या पती-पत्नीच्या भांडणात पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास भुसावळ येथे घडली. यात पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून तीला जिल्हा शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, अजय बाबुराव धामणे (वय ३५) आणि दीपमाला अजय धामणे (वय २८) दोघे राहणार भुसावळ यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. दोघांना 2 जुळी मुले देखील आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून माहेरहून पैसे आणावे यासाठी दीपमालाचा पती अजय याने शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता . दरम्यान, अजय यास दारूचे व्यसन जडले होते, अशी माहिती पीडित तिचे मामा संजय मोहन तेजकर (रा. जळगाव) यांनी दिली. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अजयने दारू पिऊन आल्यानंतर पुन्हा दीपमालास मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये दीपमालाला पेटवून दिल्याने त्यात दीपमाला ७० टक्के पूर्णपणे भाजली असून ही आग विझवताना अजय देखील १४ टक्के भाजला गेला आहे. प्रथमोपचारासाठी गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. तेथून दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत जिल्हापेठ पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे