आग्रा (वृत्तसंस्था) रविवारी मथुरा लोकसभा मतदार संघाच्या भाजपाच्या उमेदवार हेमा मालिनी यांना मतदान करण्याचे आवाहन अभिनेता धर्मेंद्र यांनी केले. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे, हेमा मालिनी या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. हेमाचा विजय म्हणजे मथुरा वासियांचा विजय आहे. शेतात घाम गाळणारा शेतकरी गरज भासल्यास देशाच्या रक्षणासाठीही सज्ज असतो. अशा शब्दात जाट समुदायाला मतदान करण्याचे आवाहन अभिनेता धर्मेंद्र यांनी केले. कडक उन्हात लोकांनी मोठ्या प्रमाणात धर्मेंद्रला बघण्यासाठी गर्दी केली होती. मोबाईलमध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे छायाचित्र काढण्यासाठीही लोकांची गर्दी झाली होती.
भाजपाच्या उमेदवार आणि अभिनेत्री हेमा मालिनी आपल्या मतदारसंघात अनोख्या पद्धतीने प्रचार करताना दिसत आहेत. एकदा प्रचारादरम्यान हेमा मालिनी शेतात गव्हाचे पीक कापताना शेतमजूर महिलांसोबत दिसल्या तर दुसरीकडे ट्रॅक्टर चालवताना दिसून आल्या. दरम्यान, यासंबंधीचे त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
हेमा मालिनी यांनी २००४ मध्ये हेमा मालिनीने भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या २००३ ते २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्य होत्या. २०१४ लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी मथुरा मतदार संघामधून लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पुन्हा त्यांना भाजपाने मथुरा याच मतदार संघातून रिंगणात उतरविले आहे.