
चंद्रपूर-वृत्तसेवा | देशात ‘वाघांचा जिल्हा’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील जवळपास अर्धे, म्हणजे सुमारे ३०० वाघ आढळतात. जिल्ह्यात एकूण ४८४५.३० चौ.कि.मी. म्हणजे भौगोलिक क्षेत्राच्या ४२.३४ टक्के वनक्षेत्र आहे. जगातील वाघांच्या संख्येच्या सुमारे ५ टक्के वाघ या जिल्ह्यात असल्याचा अंदाज आहे. मात्र वाढत्या वन्यप्राण्यांच्या संख्येला अनुरूप सुरक्षित अधिवास उपलब्ध नसल्याने मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून मानवी जीवनासह वन्यजीवही संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यात वाघांसह बिबट, हरीण, रानडुक्कर, चितळ, नीलगाय, रानगवे आदी प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वनक्षेत्रावर अतिक्रमण, वाढता मानवी हस्तक्षेप आणि अधिवासाचे तुकडीकरण यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र आहे. परिणामी हल्ल्यांच्या घटना वाढल्या असून दोन्ही बाजूंनी जीवितहानी होत आहे.
जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघ संवर्धनासाठी विकसित करण्यात आला असला, तरी पर्यटनवाढीवर भर, रिसॉर्ट बांधकामे आणि वनक्षेत्रातील वाढता हस्तक्षेप याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष न दिल्याची टीका होत आहे. वन्यजीवांच्या अधिवासात मानवी अडथळे निर्माण झाल्याने त्यांचे स्थलांतर मानववस्तीकडे होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
२०२५ या वर्षात मानव-वन्यजीव संघर्षात ४९ नागरिकांचा मृत्यू झाला. गत पाच वर्षांत २०० हून अधिक नागरिकांनी जीव गमावला आहे. २०२६ च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांतच ६ जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर २०२५ मध्ये १२ वाघ आणि ५ बिबटांचा मृत्यू नोंदविण्यात आला असून इतर अनेक वन्यप्राण्यांचाही जीव गेला आहे. वाढती मृत्यूसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे.
बल्लारशा–गोंदिया रेल्वेमार्ग हा दक्षिण विदर्भातील वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे दिसते. गतवर्षभरात रेल्वेच्या धडकेत वाघ, रानगवे, अस्वल, सांबर, चितळ आदी प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. हा मार्ग दक्षिणेला ताडोबा प्रकल्प आणि कन्हाळगाव अभयारण्याला जोडणाऱ्या तसेच उत्तरेला ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या व्याघ्रभ्रमण मार्गांना छेद देतो. त्यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालींवर परिणाम होत आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी अधिवास संरक्षण, वनक्षेत्र वाढ, अतिक्रमण रोखणे, रेल्वेमार्गांवर संरक्षक उपाययोजना आणि स्थानिकांना तातडीची नुकसानभरपाई अशा शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. अन्यथा ‘वाघांचा जिल्हा’ ही ओळख जपत असताना मानव आणि वन्यजीव दोघांचेही अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



