जळगाव (प्रतिनिधी) भारत सरकार मानव अधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळेंनी नुकताच शहरातील अंध व अपंग विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दीपस्तंभ प्रतिष्ठानचे मनोबल केंद्रात हा कार्यक्रम झाला. यावेळी या विद्यार्थांनी आपल्या अनेक व्यथा श्री. मुळे यांच्यासमोर मांडल्या.
नियतीने त्यांच्यावर अन्याय केलेला..समाजाने झिडकारलेले.. ते अंध..अपंग पण अंगात जिद्द..या जिद्दीमुळेच त्यांच्या डोळ्यात चमक दिसत होती. सर्व दीपस्तंभच्या मनोबलचे विद्यार्थी..आज ते खुशीत होते कारण त्यांच्या समोर मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळेंशी त्यांचा संवाद होत होता. आम्हाला नोकऱ्या मिळत नाही. मिळाल्या तर अंध म्हणून नंतर काम देत नाहीत. बसवून ठेवतात. परीक्षेसाठी लेखनिक मिळत नाही,अशा एक ना अनेक व्यथा अंध व अपंग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळें सरांकडे मांडल्या.
यजुर्वेद्र महाजन एकेका विद्यार्थ्याची माहिती आणि प्रतिकुल परीस्थीतून त्याने मिळवलेले यश याबाबत अडचणी सांगत होते. ज्ञानेश्वर मुळे एक संवेदनशील लेखक असल्याने नुसत्या समस्या ऐकल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. काही गोष्टी सांगून त्यांचे मनोबल उंचावले. यावेळी विद्यार्थ्यांना सोबत मुळेंनी प्रार्थना आणि गाणी म्हटली. ज्ञानेश्वर मुळेंनी यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्येवर काय मार्ग काढता येईल. तसेच मानवाधिकार आयोगाची निर्मिती तसेच आयोगाची कामे यांची माहिती देत आयोग तुमच्या पाठीशी आहे, असे सांगत आश्वत केले. दीपस्तंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष यजुर्वेद्र महाजन मनोबल केंद्र प्रमुख लक्ष्मण सपकाळे यावेळी उपस्थीत होते .