Home Cities जळगाव ‘एक वही एक पेन’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद : महापरिनिर्वाण दिनी अनोखा उपक्रम

‘एक वही एक पेन’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद : महापरिनिर्वाण दिनी अनोखा उपक्रम


जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगाव शहरात सामाजिक बांधिलकी जोपासणारा एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संचलित संकलन समितीने चालवलेल्या ‘एक वही एक पेन’ या अभियानाने शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळवत समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आज सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात रात्री दहा वाजेपर्यंत वाह्या आणि पेनचे संकलन करण्यात आले. सतत सोळा ते अठरा वर्षांपासून या समितीद्वारे हा उपक्रम राबविला जात असून, यंदाही नागरिकांनी मनापासून सहभाग नोंदवत शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात जमा केले. या संकलित वह्या आणि पेन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.

अभियानाची संकल्पना समाजातील शैक्षणिक विषमता कमी करण्याच्या हेतूने राबविण्यात आली असून, दरवर्षी या उपक्रमाद्वारे अनेक विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या या अभियानाने डॉ. आंबेडकरांच्या शिक्षण आणि समतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा संदेश दिला.

या उपक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच समितीचे चेतन ननवरे, प्रशांत सोनवणे, डॉ. अनिल शिरसाळे, सचिन बडगे, हरिश्चंद्र सोनवणे, तसेच आदरणीय भन्ते धम्मबोधी आणि अंकिता गजरे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचबरोबर शहरातील नागरिकांनी सुद्धा या उपक्रमास उत्साहाने साथ देत समाजहिताची भावना दृढ केली.


Protected Content

Play sound